खळबळजनक! अत्याचार पीडितेस विवस्त्र करून मारहाण
पती-पत्नीने दिली फिर्याद । तोफखाना पोलीस ठाण्यात दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर । नगर सह्याद्री -
सामुहिक अत्याचाराचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी पतीसह विवस्त्र करून अंगावर पेट्रोल ओतून अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अर्जुन साहेबराव वाघ, तुषार वाघ, बंडू हिराजी मतकर, अरुण नबाजी मतकर, हिराजी त्रंबक मतकर (सर्व रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी), सुभाष श्रीकृष्ण कराळे (रा. कराळे शिंगवे, ता. पाथर्डी), दिलीप मच्छिंद्र नगरे (रा. ब्राह्मणी, ता. राहुरी), रंगा जाधव (रा. जवखेडे फाटाजवळ) व दोन अनोळखी इसम स्वत:ला पोलीस म्हणविणारे यांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, पीडिता ही पतीसह दि. 24/02/ 2020 रोजी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथून रिक्षाने निघाली होती. त्या रिक्षात एक अनोळखी इसम बसला. रिक्षा थोडी पुढे गेल्यावर त्याने पीडिता व तिच्या पतीचे नाकाला काहीतरी हुंगवुन त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर एका अज्ञातस्थळी नेऊन खोलीत बंद करून त्याठिकाणी दहा जणांनी ’आम्ही पोलिस आहोत. तुम्हाला खाकी दाखवणार आहोत’, असे म्हणून पीडिता व तिच्या पतीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच तुम्ही पोलिसाचे नादी लागता काय, असे म्हणून त्यांनी पीडिता व तिच्या पतीचे अंगावरील कपडे काढून त्यांना विवस्त्र करून त्यांचे अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पट्ट्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मारताना त्यांना उलट लटकविले. ’तुम्ही कोणत्याही केसला हजर होऊ नका. आम्ही हाणमार केली, याची तक्रार करू नका. आमच्या हिवरकर साहेबांच्या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला नसता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. तुम्ही हिवरकर साहेबांच्या विरोधात तसेच तुम्ही कोणाविरुद्ध तक्रार दिली, तर आता आम्ही रेकॉर्डिंग करीत आहोत’, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
२६/०२/२०२० रोजी दिगंबर कराळे याने पीडितेच्या फोनवर संपर्क साधून ’अगोदरच्या केसमधून नाव काढून टाक. मी तुला २४/०२/२०२० रोजीची घटनेची व्हिडिओ क्लिप देतो’, असे म्हणून त्याने पांढरीपूल येथे त्याचे मेमरी कार्डमध्ये व्हिडिओ क्लिप घेऊन आला. दुसर्या दिवशी पीडितेच्या पतीने मोबाईल दुकानातून सेकंड हॅन्ड मोबाईल घेतला व ती क्लिप पहिली. तसेच आरोपींनी ती व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी हे करीत आहेत.
जिल्ह्यात प्रचंड खळबळ
या घटनेमुळे जिल्हाभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशावरून पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत आहेत. बलात्कारातील पीडितेला विवस्त्र करून मारण्याच्या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
No comments
Post a Comment