नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकरी रस्त्यावर
खडकीत संत्रा रस्त्यावर फेकून आंदोलन । हेक्टरी 1 लाख रुपये भरपाई द्या
अहमदनगर । नगर सह्याद्री -
नगर तालुक्यातील काही भागात रविवारी रात्री वादळी वारा आणि अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला. त्यात खडकी, बाबुर्डी बेंद परिसरातील संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले. मात्र सोमवारपर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी हे नुकसान पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी मंगळवारी सकाळी वादळी वार्याने गळालेला संत्रा रस्त्यावर फेकून आंदोलन करत नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
नगर तालुक्यातील खडकी परिसराला संत्रा फळबागांचे आगर मानले जाते. खडकी, बाबूर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, सारोळा कासार या भागात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबाग आहेत. खडकी परिसरात 500 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबाग आहे. रविवारी रात्री 8 च्या सुमारास या भागात अवकाळीचा फटका बसला, यावेळी पाऊस तुरळक असला तरी जोरदार वार्यामुळे तोडणीला आलेल्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात फळे गळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
सोमवारी याबाबत माहिती होऊनही कोणताही प्रशासकीय अधिकारी या भागात पाहण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी मंगळवारी सकाळीच गाळलेल्या फळांसह नगर दौंड रस्त्यावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, प्रविण कोठुळे, राहुल बहिरट, राघु चोभे, मनेष भोसले, ग्रामपंचायत सदस्य महेश कोठूळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, केतन निकम, ऋषी कोठुळे, राहुल कोठुळे, अशोक कोठूळे, अमृत कोठुळे, नवनाथ कोठुळे, रतन बहिरट, अर्जुन रोकडे, आदिनाथ गायकवाड, सुनील कोठुळे, भाऊसाहेब खेंगट यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही : आ. लंके
अवकाळी पावसाच्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. नगर तालुका प्रशासन त्यात चालढकल करू शकत नाही. त्यांना मी पंचनाम्याच्या सूचना देणार आहे. बुधवारी दुपार नंतर प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागास भेट देणार असल्याची प्रतिक्रीया आमदार निलेश लंके यांनी दिली.
No comments
Post a Comment