टाकळी ढोकेश्वर नवे पोलिस स्टेशन
राज्य सरकारची मान्यता सहायक निरीक्षकासह ४३ पोलिस कर्मचार्यांची होणार नियुक्ती
अहमदनगर | नगर सह्याद्री -
कायदा व सुव्यवस्थेचा विचार करीत क्षेत्रफळाने मोठ्या असणार्या पारनेर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असणार्या टाकळी ढोकेश्वर येथे नव्याने पोलिस ठाणे (स्टेशन) मंजूर करण्यात आले आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश आज काढले असून नगरच्या पोलिस अधिक्षकांना टाकळी ढोकेश्वर पोलिस स्टेशनसाठी सहायक निरीक्षकासह ४३ पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे यासाठी अनेक दिवसांची मागणी होती. पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या कारकिर्दीत येथे नव्या पोलिस चौकीसह अन्य कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला होता. आता नव्याने पोलिस ठाणे मंजूर झाल्याने टाकळी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नव्याने मंजुर करण्यात आलेल्या टाकळी ढोकेश्वर पोलिस स्टेशनसाठी १ सहायक पोलिस निरीक्षक, २ पोलिस उपनिरीक्षक, ३ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ६ पोलिस हवालदार, ९ पोलिस नाईक आणि २२ पोलिस शिपाई अशा ४३ जणांच्या मंजुरीचे आदेश काढण्यात आले आहेत. लवकरच हे पोलिस स्टेशन कार्यान्वीत केले जाईल अशी माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.
No comments
Post a Comment