भिंगार छावणी परिषदेमध्येही शिवसेना-राष्ट्रवादीचे तुझं माझं जमेना
उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रकाश फुलारी बिनविरोध । सेनेला भाजपचा पाठिंबा
भिंगार । नगर सह्याद्री -
भिंगार कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘तुझे माझे जमेना’ असेच पहायला मिळाले. उपाध्यक्ष निवडीमध्ये भाजपाला बरोबर घेत शिवसेनेने राष्ट्रवादीला जोराचा धक्का देत उपाध्यक्षपद बिनविरोध निवडून आणले. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत भाजपाच्या एका सदस्यांने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीने शांत रहात उमेदवार न दिल्याने ही निवड बिनविरोध झाली.
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी होवून सत्ता स्थापन झाली. यानंतर आगामी होणार्या सर्व स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची घोषणा वरिष्ठ नेत्यांनी केली. मात्र नगर शहरात शिवसेना व राष्ट्रवादीचे ‘तुझं माझं, जमेना’ असे झाले आहे. याचा प्रत्यय भिंगार कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्ष निवडीमध्ये आला.
भिंगार कॅन्टोन्मेंटची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यातच उपाध्यक्ष मुसदिक सय्यद यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक झाली. भिंगार कॅन्टोन्मेंटमध्ये राष्ट्रवादी 3, शिवसेना 3 व भाजपाला 1 असे बलाबल आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये भाजपाने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. यामुळे उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीने अलिप्त राहिल्याने उपाध्यक्षपदाच्या जागेसाठी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यांच्या अर्जावर सूचक म्हणुन रवींद्र लाला बोंद्रे तर अनुमोदक म्हणुन संजय छल्लानी यांच्या सह्या आहेत. या निवडीसाठी भाजपाच्या शुभांगी साठे, मावळते उपाध्यक्ष मुसदिक सय्यद, कलीम शेख, विना मेहतांनी आदी उपस्थित होते.
भिंगार कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षपदी प्रकाश फुलारी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड, भाजपाचे शहराध्यक्ष मिलिंद गंधे, अॅड. अभय आगरकर, दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर, सुनील लालबोद्रे, सदस्य रवी लालबोद्रे, संजय छजलाणी, शुभागी साठे, महेश नामदे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष निवडीसाठी भिंगार छावणी परिषदेचे ब्रिगेडर विजयसिंग राणा, विद्याधर पवार यांनी काम पाहिले. निवडीनंतर उपनेते अनिल राठोड, अॅड. अभय आगरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
No comments
Post a Comment