विखेंनी खोड्या काढल्याने नगरमध्ये भाजपा पराभूत!
अहमदनगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात भाजपाचे आधी पाच व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेले दोन असे मिळून सात आमदार होते. त्यात वाढ होण्याऐवजी ती संख्या तीनवर आली. जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या पराभवास कॉंग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच जबाबदार असल्याचा आणि ते जेथे जातात तेथे खोड्या करतात, त्यातून त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण तयार करतात असा थेट हल्लाबोल नगर जिल्ह्यातील भाजपाचे पराभूत उमेदवार माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह स्नेहलता कोल्हे व शिवाजी कर्डिले यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्याच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. आमदार आशिष शेलार यांनी नाशिक येथे बैठक घेऊन नगर जिल्ह्यातील पराभूत उमेवारांशी चर्चा केली व पराभवाची कारणं जाणून घेतली. या बैठकीला प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना या तिघांनीही पराभावास कारणीभूत असल्याचे अंगुलीनिर्देश विखेंच्या नावाने केला. राम शिंदे यांनी पहिल्यांदाच विखेंवर थेट शरसंधान साधले.
आ. आशिष शेलार यांच्यासमोर विखेंच्या विरोधात पाढा वाचताना कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी थेटच हल्ला केला. विखेंनी एका मतदारसंघात स्वत:च्या मेव्हण्याला अपक्ष म्हणून उभं केलं होतं. पण त्यांचं डिपॉझिट जप्त झालं,’ असं त्या म्हणाल्या. राम शिंदे यांनीही थेटपणे हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले, ‘नगर जिल्ह्यातील जागा १२-० नं जिंकू असं विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असं नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात.’ शिवाजी कर्डिले यांनी शिंदे- कोल्हे यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे सांगत विखेंवर निशाणा साधला.
No comments
Post a Comment