सारिपाट / शिवाजी शिर्के…सत्तेची मस्ती जिरवणारा निकाल!
सारिपाट / शिवाजी शिर्के
राजकीयदृष्ट्या राज्यात लक्षवेधी म्हणून कायमच नगर जिल्ह्याचा लौकीक राहिला आणि तो या निवडणुकीतही दिसला. भाजपाच्या ताब्यात गेलेला हा जिल्हा पवारांची जादूची कांडी फिरताच पुन्हा आघाडीच्या ताब्यात आला. संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसने विजय मिळविला. भाजपाच्या नेत्यांनी फाजिल आत्मविश्वासात सारेच गमावले. शिवसेनेचा तर सुपडा साफ झाला असंच म्हणावं लागेल. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विखे फॅक्टर चाललाच! राहुरी, पारनेर या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार फक्त विजयी झाले नाही तर त्यांना प्रचंड मताधिक्य मिळाले. पारनेरमध्ये विखे पाटील समर्थक माजी आमदार नंदकुमार झावरे-राहुल झावरे या पितापुत्रांनी उघडपणे लंके यांचे केलेले काम आणि राहुरीत विखे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांना दिलेली भक्कम साथ ‘मोलाची’ ठरली असली तरी त्यास किनार राहिली ती लोकसभा निवडणुकीतील मदतीची! तेल लावलेला पहिलवान राहुरीतून संपविण्याचा चंग राहुरीकरांनी जसा बांधला होता तसाच तो ‘प्रवरे’च्या यंत्रणेनेही असंच म्हणावं लागणार आहे.
नगर शहर मतदारसंघात चुरशीची निवडणूक झाली. सेनेच्या अनिल राठोड यांना अतिआत्मविश्वास नडला. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप व त्यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीत शहरात मिळालेले कमी मताधिक्य विचारात घेऊन सहा महिन्यांपासूनच विधानसभेची तयारी हाती घेतली. त्यातूनच जगताप समर्थक चिकाटीचे काम करताना दिसत होते. उलटपक्षी राठोड व शिवसेनेचे पदाधिकारी- नगरसेवक फक्त सोशल मिडियात धनुष्यबाणाची पतंगबाजी करताना दिसून येत होते. भावनेच्या नव्हे तर विकासकामाच्या मुद्यावरच निवडणूक होते हे जगताप यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा दाखवून दिले.
पारनेर विधानसभा मतदारसंघात सलग पंधरा वर्षे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आ. विजय औटी यांच्या विरोधात निलेश लंके यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. औटी यांचा स्वभाव, त्यांनी केलेला अपमान याच गोष्टीचे भांडवल लंके यांनी केले. लंके समर्थकांनी गावागावात जाऊन तुमच्या गावात कोणाचा अपमान झाला नाही असा कार्यकर्ता दाखवा असे जाहीर आवाहनच केले. ते आवाहन खोडून काढण्यात औटी समर्थक कमी पडले. प्रचंड विकास कामे केल्यानंतरही भावनिक मुद्यावर येथे निवडणूक आली आणि शेवटच्या टप्प्यात नंदकुमार झावरे व त्यांच्या समर्थकांनी त्यास फोडणी दिली. ही फोडणी दखल घेण्यासारखीच नसल्याचा कांगावा औटी समर्थकांनी केला आणि येथेच चूक झाली. औटी यांना पहिल्यांदा आमदार करण्यात नंदकुमार झावरे हेच कारणीभूत ठरले आणि आता त्यांना पराभूत करण्यातही तेच कारणीभूत ठरले.
राहुरीतूून भाजपाच्या शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात सारेच एकवटले. ‘तेल लावलेला पहिलवान आहे’, अशी गुर्मीची भाषा वापरणार्या कर्डिलेंना राहुरीकरांनी यावेळी थोपविण्याचा निर्णय कधीच घेतला होता. प्राजक्त तनपुरे हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुरी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला खा. सुजय विखे पाटलांच्या शेजारी बसले त्याचवेळी राहुरीकरांना काय द्यायचा तो ‘मेसेज’ दिला गेला होता. लोकसभा निवडणुकीत कर्डिलेंनी जावयाला केलेल्या मदतीचा वचपाच विखे पाटलांच्या समर्थकांनी काढला असे म्हणण्यास वाव मिळतो. याशिवाय राहुरीतील शिवसेनेची साथ कर्डिलेंना मिळाली असली तरी नगर- पाथर्डीे या दोन तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी उघडपणे कर्डिलेंच्या विरोधात काम केले.
नेवासा मतदारसंघात बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात लाट होतीच. दोन वर्षे आधीपासून शंकरराव आणि प्रशांत गडाख यांनी निवडणुकीची तयारी चालवली होती. शेवटच्या टप्प्यात येथे घुले पाटलांची साथ गडाखांना मिळाली. पद्धतशिरपणे हातात घेतलेली निवडणूक प्रशांत गडाख यांनी शंकररावांना आमदार करूनच संपवली असेच म्हणावे लागेल.
कर्जत- जामखेडमध्ये राम शिंदे यांनी विकास कामे केली असली तरी त्यांनी ठेकेेदार तयार केले आणि हे ठेकेदार गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांना त्रासदायक झाले. रोहीत पवार यांनी दोन वर्षे येथे तयारी करताना पाण्याच्या टँकरपासून ते अगदी किरकोळ कामापर्यंत लक्ष घातले. तीच त्यांची जमेची बाजू राहिली. कर्जत- जामखेडमध्ये मोदी- शहांना सभा घ्याव्या लागल्या त्याचवेळी शिंदे अडचणीत असल्याचे स्पष्ट झाले.
अकोलेमध्ये पिचड यांचे पक्षांतर अनेकांना खटकले. शरद पवार यांनी येथे घेतलेली सभा आणि पिचडांचा घेतलेला खरपूस समाचार जनतेला भावला. पिचड यांच्या विरोधात सर्वच विरोधक एकवटले. स्थानिक जनतेलाही पिचड यांची कोलांटउडी खटकली. त्यातून मोठ्या मताधिक्याने किरण लहामटे विजयी झाले. संगमनेर आणि शिर्डीतून अनुक्रमे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हेच विजयी होणार होते व झालेही तसेच. त्यामुळे येथील निकालाबद्दल कोणालाच फारसे आश्चर्य वाटले नाही.
श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब कांबळे यांचा बदलाच घेतला गेला असे म्हणावे लागेल. कांबळे यांनी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी करू नये असे विखे पाटलांना वाटत होते. मात्र, कांबळे यांनी थोरातांच्या हाकेला ओ दिली आणि उमेदवारी केली. लोकसभेत पराभूत होताच कांबळे यांनी विधानसभेच्या तोंडावर मातोश्री गाठली आणि सेनेची उमेदवारी मिळविली. विखे पाटलांनी कांबळे यांच्यासाठी सभा- बैठका घेतल्या. मात्र, कार्यकर्ते थेट कॉंग्रेसच्या लहू कानडेंच्या प्रचारात होते. लहू कानडे यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने ती त्यांची जमेची बाजू ठरली व कांबळे यांच्या विरोधातील नाराजी मतदारांनी कानडे यांच्या पारड्यात टाकली.
कोपरगावमध्ये विजय वहाडणे आणि राजेश परजणे यांची अपक्ष उमेदवारी भाजपाच्या स्नेहलता कोल्हे यांच्या विजयात आडवी आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. शेवगाव- पाथर्डीमध्ये मोनिकाताई राजळे यांनी एकहाती खिंड लढवली आणि विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणे यांनी कडवी झुंज दिली. वंजारी समाज ढाकणेंसोबत जाईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, हा समाज भाजपासोबत राहिल्याचे दिसते. शेवगाव तालुक्यातूनही राजळे यांना चांगली मते मिळाली.
श्रीगोंद्यात अटीतटीच्या लढतीत अखेर बबनराव पाचपुते विजयी झाले.
No comments
Post a Comment