Breaking News

1/breakingnews/recent

वाहतूक पोलिसांना नक्की काय हवंय?

No comments

अहमदनगर । नगर सह्याद्री
मुली आणि महिलांवरील अनेक अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण देश ढवळून निघालेला असताना नगर शहर वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी मोपेड चालक तरूणीला तब्बल दीड तास रस्त्याच्या बाजुला उन्हात उभे करून ना-लायकपणाचा कळस केला. एवढेच नाहीतर त्या तरूणीकडील मोपेड गाडी वाहतूक शाखेत जमा करण्यास घेवून जात तिला व तिच्या सोबत असलेल्या लहान मुलीला सुरक्षेची काळजी न घेता त्याच चौकात सोडून दिले. त्या तरूणीबरोबर काही अघटीत घडले असते तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत सीमा अनुराज कोहिनकर यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाद मागितली आहे.

याबाबत असे की, शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता २२ वर्षीय तरूणी आपल्या ९ वर्षीय भाचीला आयकॉन पब्लिक स्कूलमधून घेवून जात असताना सक्कर चौकात नेमणुकीस असलेल्या शहर वाहतूक शाखेचे पोनि. अविनाश मोरे यांनी तरूणी घेवून जात असलेल्या मोपेडची चावी काढून घेत गाडी रस्त्याच्या बाजुला घेण्याचे सांगत लायसन मागितले. यावर तरूणीने शहर वाहतूक शाखेचे पोनि. अविनाश मोरे यांना लायसन नसल्याचे सांगितले. या तरूणीकडे मोबाईल नसल्यामुळे घरी फोन करण्यासाठी तरूणीने वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याला मोबाईल मागितला. यावर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याने मोबाईल देण्यास नकार देत दुसरा कोणाचा तरी मोबाईल घेण्यास सांगितले. यावर तरूणीने आपल्या कुटुंबियांना फोन केला. मात्र कुटुंबियांनी ओळखीच्या एका वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याला फोन करण्यास सांगितले.

यावर ओळखीच्या कर्मचार्‍याला फोन करून सर्व हकीगत सांगितली. त्यांनी गाडी पकडलेल्या वाहतूक शाखेचे पोनि. मोरे यांना फोन देण्याचे सांगितले. यावर त्या दोघांचे संभाषण झाल्यानंतर ओळखीच्या कर्मचार्‍याने असेल तो दंड भरण्याचे सांगत फोन ठेवून दिला. यावर त्या तरूणीने पोनि. मोरे यांच्याकडे किती दंड भरायचा, असे विचारताच त्या कर्मचार्‍यांने ज्याच्याशी बोलणे झाले तोही वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे, त्यालाच विचार किती दंड भरायचा? असा उलटा प्रश्‍न टाकून संबधित ओळखीच्या वाहतूक कर्मचार्‍याच्या नावाने काहीतरी बडबड सुरू केली. यासर्व प्रकाराने त्या दोघी खूप गोंधळून गेल्या होत्या. बराच वेळ गेल्यानंतर त्या तरूणीने पुन्हा वाहतूक शाखेचे पोनि. मोरे यांना गाडी सोडण्याबाबत विचारायचा प्रयत्न केला. मात्र, थोडे थांबा असेच प्रत्येकवेळी उत्तर दिले गेले.

अर्धातास त्या दोघी तशाच रस्त्याच्या बाजुला उभ्या होत्या. यावेळेत संबधित वाहतूक शाखेच्या पोनि. मोरे यांनी अनेक दुचाकी न अडवता सोडून दिल्या. यामध्ये ट्रिपल सीट जाणार्‍या गाड्याही निघून जात होत्या. या काळात उडालेल्या गोंधळामुळे तरूणीसोबत असलेली लहान मुलगी घाबरून रडू लागली. यानंतर पुन्हा घरी फोन करण्यासाठी मोबाईल मागितला तर पुन्हा मोबाईल देण्यास नकार देत रिक्षावाल्यांकडून मोबाईल घे असे सांगितले. यावर पुन्हा रिक्षा चालकाच्या फोनवरून घरी फोन केला तर घरचे नातेवाईक घेण्यासाठी येत असल्याचे पोनि. मोरे यांना सांगितले. मात्र, हे ऐकून पोनि. मोरे यांनी तुमची गाडी वाहतूक पोलिस शाखेत घेवून जात असल्याचे सांगत तुम्ही पकडलेल्या रिक्षांमधून घरी जा, असे सांगितले.

यावर आम्ही अनोळखी व्यक्तींबरोबर जाणार नसल्याचे सांगितले. यावर नसले जायचे तर नका जाऊ, रहा इथेच. असे म्हणुन बाजुला निघून गेले. या काळात पुन्हा अर्धातास होवून गेला. या दरम्यान तरूणीला व सोबत असलेल्या लहान मुलीला खूप वेळ उभा राहिल्याने त्रास होवू लागला. तसेच सोबत पिण्यासाठी पाणीही नव्हते. तेथे परिसरात कुठेही शौचालय उपलब्ध नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र याची जाणिव तेथे असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचारी व अधिकार्‍यांना नव्हती. तसेच तेथे कोणी महिलांही नसल्यामुळे कोणाकडे मदत मागावी हे समजत नव्हते.

तेथील रिक्षाचालक व दुचाकी चालक निघून गेल्यानंतर संबधित वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याने मोपेड वाहतूक शाखेत सुरू करत घेवून जाण्याचा पयत्न केला. मात्र त्यांना गाडी सुरू झाली नाही. यावर संबधित कर्मचार्‍याने मोपेड गाडीवर स्वत: बसून तरूणीला गाडीची कीक मारावयाला सांगत लज्जा उत्पन्न होईल असे अर्वाच्च भाषेत बोलत वर्तन केले. वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या दोघींना तेथेच सोडून निघून गेले. यानंतर या तरूणीकडे रिक्षासाठी पैसे नसल्याने पायी जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र रस्त्याने जातांनाही हैद्राबाद सारखी घटना डोळ्यासमोरून फिरल्याने भिती वाटत होती. या दोघी काही अंतर चालत आल्यानंतर रिक्षामधून घरी आल्या. रिक्षांमध्येही कोणी ओळखीचे नसल्याने तेथेही भीतीने त्यांची पाठ सोडली नाही. आपला जीव तसाच मुठीत धरून त्यांनी प्रवास करत घर गाठले. घरीही कोणी नसल्याने रिक्षांचे भाडे देवू शकले नाही. यानंतर या दोघींनी आपल्या बचतबँक फोडून त्यातील पैसे काढून रिक्षाचालकाला दिले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *